प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक पेन्शन योजना आहे. भारतात अनेक असे शेतकरी आहेत ज्यांना भविष्यासाठी म्हणजेच त्यांच्या वृद्धापकाळासाठी काही निधी जमा करून ठेवून वृद्धापकाळाची व्यवस्था करता येत नाही, किंबहुना त्यांना तसे उमगतही नाही.
अश्या शेतकऱ्यांकडे वृद्धावस्थेत अतिशय कमी बचत असते किंबहुना नसतेही. आणि अश्या न कमावत्या वयामध्ये उत्पन्नाचे काही साधन तर नसतेच, परंतु बचतही नसेल तर त्यांचे जीवन अतिशय कठीण होऊन बसते. त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. आणि त्यांचे उतारवयातील आयुष्य दयनीय होऊन बसते. सरकारने राबवलेल्या योजनांपैकी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना ही एक महत्वाची योजना आहे.
योजनेचे उद्देश
अश्या शेतकऱ्यांमध्ये मुख्यत्वे लहान शेतकरी असतात. कमी असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांना पुरेसे उत्पन्नही मिळत नसते, घरखर्चाची भागाभाग होऊन शेवटी काहीच उरत नसते. मग ते भविष्याची तरतूद कशी करणार ? याच शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक मदत व्हावी म्हणून ही योजना सुरु करण्यात आली. रोजच्या गरजांबरोबरच वैद्यकीय गरजा त्यांना स्वतःच्या पैश्यातून भागवता याव्यात आणि इतरांवर त्यांचे अवलंबित्व कमी व्हावे हाच या योजनेचा मुख्य उद्देश्य होता.
योजनेचा फायदा
प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेंतर्गत या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला दरमहा 3000 रुपये एवढी रक्कम पेन्शन स्वरुपात दिली जाणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे हे सर्व कमी शेतीचे क्षेत्र धारण करणारे शेतकरी असणार आहेत. त्यांना ही रक्कम वृद्धापकाळात म्हणजेच वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा दिली जाणार आहे. जेणे करून त्यांच्या काही गरजा या रकमेतून भागवल्या जातील.
योजनेचे स्वरूप
ही एक ऐच्छिक योजना या योजनेत सभागी होणे किंवा न होणे हे सर्वोपरी त्या शेतकऱ्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. कुणालाही या योजनेत सहभागी होण्यासाठी सक्ती करण्यात येणार नाही. ही एक ऐच्छिक पेन्शन योजना आहे.
त्याचबरोबर ही योजना भारतीय जीवन बिमा निगम (LIC) द्वारे चालविली जाणार असल्याने सर्व शेतकरी या योजनेत निर्धास्त होऊन गुंतवणूक करू शकतात. आणि त्याचाच मोबदला म्हणून त्याला दरमहा पेन्शन चा लाभ मिळणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला 55 रुपये ते 200 रुपये प्रती महिना या योजनेत गुंतवावे लागणार आहेत. ही रक्कम त्या शेतकऱ्याच्या वयाला अनुसरून असेल. म्हणजेच जर एकदा शेतकरी वयाच्या 18 व्या वर्षी या योहानेत सहभागी होत असेल तर त्याला फक्त 55 रुपये एवढीच रक्कम या योजनेत दरमहा गुंतवावी लागेल आणि जर एखादा शेतकरी वयाच्या 40 वर्षी योजनेत सहभागी होत असेल तर त्याला त्याच्या प्रमाणात जास्त रक्कम दरमहा गुंतवावी लागू शकते.
जेवढी रक्कम शेतकरी या योजनेत दरमहा गुंतविल तेवढीच रक्कम केंद्र सरकारही त्या शेतकऱ्याच्या खात्यात दरमहा गुंतवणार आहे. म्हणजेच केंद्र सरकारही या योजनेत शेतकऱ्याच्या बरोबरीने रक्कम गुंतवणार असल्याने त्याच्या खात्यावर बरीच रक्कम आपोआप जमा होईल आणि त्याचाच फायदा पेन्शन मिळण्यासाठी होणार आहे. ही रक्कम शेतकऱ्याला त्याच्या वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा करत राहावी लागणार आहे. म्हणजेच त्याला सेवानिवृत्ती च्या तारखेपर्यंत त्याला ही रक्कम गुंतवावी लागणार आहे.
योजनेसाठी पात्रता
ही योजना अल्पभूदारक शेतकऱ्यांसाठी आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षे एवढे आहे तेच या योजनेसाठी पात्र आहेत. अशाच शेतकऱ्यांनी विहित पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करायचे आहेत.
जर एखाद्या शेतकरी कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही या योजनेसाठी इच्छुक असतील तर ते दोघेही या योजनेत सहभाग घेऊ शकतात. त्यांना दोघांनाही त्यांच्या वयाप्रमाणे या योजनेच्या नियमाप्रमाणे अंशदान करावे लागेल आणि त्या दोघांनाही सेवानिवृत्तीनंतर वेगवेगळा दरमहा 3000 रुपयांचा पेन्शनचा लाभ मिळेल.
योजनेतून बाहेर आल्यास काय होईल?
ही योजना आधी सांगितल्याप्रमाणे ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी असलेल्या एखाद्या शेतकऱ्याला काही काळानंतर वाटले की या योजनेतून बाहेर पडावे, तर ही योजना त्याला तसे करण्यास मुभा देते. जेव्हा शेतकरी योजनेतून बाहेर पडतो तेव्हा त्यास त्याने जमा केलेल्या अंशदानाची रक्कम व्याजासहित परत केली जाते. परंतु त्यास पेन्शनचा लाभ मिळत नाही.
सेवानिवृत्तीच्या आधी मृत्यू झाल्यास?
एखाद्या शेतकऱ्याचे सेवानिवृत्तीच्या तारखेच्या आधी निधन झाल्यास काय होईल? एखाद्या शेतकऱ्याचे सेवानिवृत्ती आधी आकस्मिक निधन झाल्यास त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा पती किंवा पत्नी उरलेल्या सेवानिवृत्ती तारखेपर्यंत अंशदान करून योजना सुरु ठेऊ शकते. आणि त्या योजनेचा लाभ घेऊ शकते.
मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नंतर त्याच्या पती/पत्नी ची इच्छा ही योजना पुढे चालवण्याची नसेल तर त्या व्यक्तीला अंशदानाची रक्कम व्याजासहित परत केली जाईल.
परंतु जर मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नंतर पती किंवा पत्नी नसेल तर त्या व्यक्तीच्या वारसाला त्या योजनेतील एकूण अंशदानाची रक्कम व्याजासहित परत केली जाईल.
सेवानिवृत्तीच्या नंतर मृत्यू झाल्यास?
जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू सेवानिवृत्ती नंतर झाल्यास काय होईल? जर मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नंतर पती किंवा पत्नी असेल तर त्याला/तिला कौटुंबिक पेन्शनच्या रुपात 50% रक्कम म्हणजेच 1500 रुपये दरमहा पेन्शन स्वरुपात मिळतील.
अर्ज कोठे करावा?
जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत आणि या योजनेसाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात (CSC) जाऊन आपली नाव नोंदणी करावी.
पात्र शेतकरी जर पीएम किसान (PM-Kisan) योजनेचा लाभार्थी असेल तर त्याच्या पीएम किसान योजनेच्या बँक खात्यात याही योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्याला वेगळे बँक खाते देण्याची गरज नाही.
त्याचबरोबर या योजनेत भाग घेण्यासाठी पीएम किसान स्टेट नोडल ऑफिसर कडे अर्ज करू शकता शिवाय ऑनलाईन माध्यमातूनही अर्ज करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जमिनीचा उतारा